तीन महिला नक्षलवादी चकमकीत ठार   

नवी दिल्ली/ रायपूर : छत्तीसगढ-तेलंगणाच्या सीमेवर सुरक्षा दलाबरोबरील चकमकीत गुरूवारी तीन महिला नक्षलवादी ठार झाल्या. छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यातील कुरेगुट्टा जंगल परिसरात ६० तासांपासून  नक्षलविरोधी कारवाई सुरू आहे. देशातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी नक्षलविरोधी कारवाई मानली जात आहे. यात छत्तीसगढ आणि तेलंगणातील सुरक्षा दलाचे कर्मचारी सहभागी आहेत. आतापर्यंत तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. आणखी काही नक्षलवादी ठार झाले असल्याचे वृत्त आहे. दोन्ही बाजूकडून अधून-मधून गोळीबार सुरू आहे.या कारवाईत छत्तीसगढ पोलिसांव्यतिरिक्त विशेष कृती दल (एसटीएफ), जिल्हा राखीव रक्षक दल (डीआरजी), बस्तर फायटर्स, राज्य पोलिसांच्या सर्व तुकड्या, तेलंगणाचे पोलिस आदी सहभागी आहेत.
 
काल सकाळी साडेनऊच्या सुमारास तीन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. यासोबतच, घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अद्याप कारवाई सुरू आहे, असे सीआरपीएफचे महासंचालक जी.पी. सिंग यांनी सांगितले. २१ एप्रिलपासून रायपूर आणि जगदलपूरमधील नक्षलवादविरोधी मोहिमेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही ते म्हणाले.
 
या मोहिमेत चार हेलिकॉप्टर, दोन ड्रोन यांचीदेखील मदत घेतली जात आहे. अनेक दिवसांपासून हवा असलेला म्होरक्या हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा यांच्यासह प्रमुख नक्षलवादी नेत्यांच्या हालचालीबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. नक्षलवाद्यांच्या पलायनाचे सर्व मार्ग बंद करण्यासाठी सुरक्षा दलांनी छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील कर्रेगुट्टा भागाला घेरले आहे. घनदाट जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला हा परिसर नक्षलवाद्यांच्या बटालियन क्रमांक १ चा अड्डा मानला जातो. काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले होते. त्यातून त्यांनी ग्रामस्थांना डोंगरात प्रवेश न करण्याचा इशारा दिला होता. या भागात मोठ्या प्रमाणात आयईडी पेरण्यात आले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते.
 

Related Articles